व्यंकटेश वैष्णव , बीडमागील चार दिवसांत जिल्ह्यात रिमझिम झाला असला तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील १४४ सिंचन प्रकल्पांची धरणक्षेत्रे कोरडीठाक आहेत. झालेल्या पावसावर खरिपाची पिके तात्पुरती तगतील, मात्र अद्यापपर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. सद्यस्थितीस ५७५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.जिल्ह्यात एकूण १४४ सिंचन प्रकल्प आहेत. यामध्ये दोन मोठे प्रकल्प असून, माजलगाव व केज तालुक्यातील धनेगाव येथील प्रकल्पांचा समावेश आहे. माजलगाव प्रकल्पात ५७.८ द.ल.घ.मी. (मृतसाठा) पाणी आहे. गत आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे ०.८ द.ल.घ.मी. पाणी वाढले आहे. दुसरीकडे, धनेगाव धरण मात्र कोरडेठाक आहे. जुलै महिना अर्धा संपत आला आहे तरी देखील जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात एकूण १४४ लहान, मोठे, मध्यम प्रकल्प आहेत. यामध्ये मध्यम प्रकल्प (गोदावरी खोरे) १० आहेत. या प्रकल्पात ५.८३ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. लघुप्रकल्प ९९ आहेत. यात १.५४ द.ल.घ.मी. पाणी आहे. बीड विभागात मध्यम व लघु प्रकल्पांची ३३ एवढी संख्या आहे. यामध्ये ०.३४ द.ल.घ.मी. पाणी आहे. वरीलप्रमाणे १४४ सिंचन प्रकल्पांमध्ये ०.८७ टक्के पाणी आहे. अशी सद्यस्थिती आहे.जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत दमदार पाऊस झाला नाही तर पाणीपातळीत तसूभरही वाढ होणे शक्य नाही. रिमझिम पावसावर खरिपाची पिके तरू शकतात मात्र, बीड जिल्ह्यातील दुष्काळ हटणे शक्य नाही. रिमझिम पावसावर जिल्ह्यात १०४ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मात्र, दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.बीड जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. रिमझिम पावसामुळे खरिपाची पिके दमदार आहेत. मात्र, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा अवधी उलटला, तरी देखील जिल्ह्यातील लघु, मध्यम, मोठे प्रकल्प कोरडेठाक आहेत. माजलगाव प्रकल्पात गत आठवड्यात झालेल्या रिमझिममुळे ०.८ द.ल.घ.मी. पाणी वाढले आहे.
धरणक्षेत्रे कोरडीठाक
By admin | Updated: July 12, 2016 01:02 IST