रामनगर : जालना तालुक्यातील द्राक्ष फळपिकांचा पट्टा म्हणून ओळखला जाणाऱ्या कडवंचीसह परिसरातील गतवर्षी फळपिकांचा भरणा केलेल्या द्राक्ष फळपिकासाठी ४१ लाख रुपये आंध्रा बँकेला प्राप्त झाले आहेत. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संदर्भात बँकेचे कृषी अधिकारी मनोज जुगसेनिया म्हणाले की, कडवंची, वरूड, धारकल्याण येथील द्राक्ष उत्पादकांपैकी जवळपास ४७ शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत द्राक्ष पिकाचा विमा हप्ता भरला होता. शाखाधिकारी पी.डी. खुडे आणि कृषी अधिकारी मनोज जुगसेनिया यांनी कंपनीकडे पाठपुरावा केला असता ४७ शेतकऱ्यांना ४१ लाख रुपयांचा द्राक्ष फळपीकविमा बँकेस प्राप्त झाला. त्याचे वाटप करणेही सुरू झाल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. द्राक्षासाठी हेक्टरी साधारण ९५ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाल्याने दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हवामानावर आधारित फळपीक विमा हा अधिकचे तापमान, अधिकचा पाऊस, अधिक थंडी आणि याचा ठराविक कालावधी असल्याने फळपिकाचा विमा भरण्यासाठी फळबाग उत्पादक धजावत नसल्याचे सुरेश क्षीरसागर, विष्णू क्षीरसागर, सरपंच दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले. तसेच फळपीक विमा नुकसान होऊनही मिळत नसल्याचे डाळींब तसेच मोसंबी उत्पादक संघाचे भगवानराव डोंगरे यांनी सांगितले.
द्राक्ष उत्पादकांना दुष्काळात दिलासा
By admin | Updated: July 29, 2015 00:47 IST