औरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. दररोज कुठे ना कुठे मोकाट कुत्र्याने सर्वसामान्यांना चावा घेतल्याच्या घटना घडतच आहेत. मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांना आवर घालण्यात मनपाला सपशेल अपयश येत आहे. रविवारी कटकटगेट भागात एका मोकाट कुत्र्याने पाचवर्षीय चिमुकल्याचे लचके तोडले.सदफ कॉलनी, गल्ली नं. ५ मध्ये हुजैर खान जावीद खान या पाचवर्षीय मुलाच्या कानाला मोकाट कुत्र्याने चावा घेतला. जखम एवढी मोठी होती की, चिमुकला रक्तबंबाळ झाला होता. या घटनेनंतर नागरिकांमध्ये महापालिकेच्या विरोधात असंतोष खदखदत होता. काही नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर सोमवारी या भागात मोकाट कुत्रे पकडणारे वाहन अनेक वर्षांनंतर नागरिकांना पाहायला मिळाले. कुत्रे पकडणाऱ्या पथकाला नेहमीप्रमाणे या भागात गरीब दोन तीन कुत्रे सापडले. इतर त्रास देणारे कुत्रे मात्र, पळून गेले.कुत्र्याने लचके तोडल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कुठेच रेबीजचे इंजेक्शन भेटत नाही. घाटी रुग्णालयातही काही महिन्यांपासून रेबीजच्या इंजेक्शनचा तुटवडा आहे. खाजगीत दोन हजार रुपयांचे इंजेक्शन घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. महापालिकेने या गंभीर घटनेनंतर तरी मोकाट कुत्र्यांसंदर्भात व्यापक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कटकटगेट परिसरातील नागरिकांनी केली.
कुत्र्याने तोडले लचके!
By admin | Updated: September 8, 2015 00:39 IST