औरंगाबाद : संपकरी डॉक्टरांनी रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत रुजू व्हा अन्यथा ‘मेस्मां’तर्गत गुन्हे नोंदविण्यात येतील, असा इशारा शासनाने जाहीरपणे देऊनही संप सुरूच असल्यामुळे रुग्णांचे हाल सुरूच आहेत. संपकरी डॉक्टरांवर सोमवारी कारवाईची चिन्हे आहेत.राज्यातील राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मॅग्मो संघटनेने ३० जूनपासून संप पुकारला आहे. संपकरी डॉक्टरांशी शासनाने चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु डॉक्टरांचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी संप सुरूच ठेवला. शासनाने संपकरी डॉक्टरांवर मेस्मांतर्गत गुन्हे दाखल करण्याचा इशारा देत रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत रुजू होण्याचे आवाहन वर्तमानपत्रातून केले होते. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे संघटनेचे पदाधिकारी डॉ. संदीपान काळे यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी रविवारी दिवसभर जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर धरणे धरले होते.अस्थायी डॉक्टरांचे निलंबनदरम्यान, औरंगाबादसह, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील ३५१ डॉक्टर संपात सहभागी असल्याचे औरंगाबाद विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. आर. टी. चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. यात २४५ स्थायी, ५३ अस्थायी आणि ५३ बंधपत्रित डॉक्टरांचा समावेश आहे. अस्थायी आणि बंधपत्रित डॉक्टरांना शनिवारीच निलंबनाची नोटीस देण्याचे आदेश आले असून, ही कारवाई जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरून करण्यात येत आहे.
डॉक्टरांचा संप सुरूच
By admin | Updated: July 7, 2014 00:41 IST