सितम सोनवणे लातूरगरीब अन् होतकरु विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला डॉक्टरांचे सलाईन मिळाले आहे. डॉक्टरांच्या व्हॉटस्अॅप ग्रुपने ही लाखमोलाची मदत केली आहे. ग्रुपमध्ये असलेल्या देश-विदेशातील डॉक्टर सदस्यांनी १३ विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेत मानवतेचे दर्शन घडविले आहे.मराठवाड्यातील गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील गुणवंत, होतकरु १३ विद्यार्थ्यांना या व्हॉटस्अॅप ग्रुपने दत्तक घेतले आहे. दुष्काळाने होरपळलेल्या विद्यार्थ्यांना ग्रुपने मदतीचा हात दिला आहे. नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षणासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थी एकत्र आले़ यामुळे अनेकांच्या एकमेकांशी ओळखी झाल्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जण नोकरीनिमित्त देश-विदेशात गेले, पण स्मार्ट फोनच्या व्हॉटस्अॅप वापरामुळे पुन्हा मित्रपरिवार जोडला गेला़ मराठवाड्यात सलग तीन वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत़ दुष्काळी परिस्थितीत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मदतीचा हात दिला पाहिजे या विचारावर ग्रुपमध्ये चर्चा झाली़ त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात गरीब व इयत्ता १० मध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ११ व १२ वीच्या शिक्षणासाठी मदत करण्याचे ठरविण्यात आले़ विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक कारणामुळे थांबू नये यासाठी २०० जणांच्या ग्रुपमधील ९० सदस्यांनी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या मदतीनुसार साडेचार लाख रुपये जमा झाले आहेत़ त्यातील ५० हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले आहेत़ उर्वरित चार लाख रुपये १३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३० हजार रुपयांची मदत इयत्ता ११ व १२ वीसाठी असे सलग दोन वर्ष देण्याचे जाहीर करून ती देण्यात आली आहे़
गरीब, होतकरु विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला डॉक्टरांचे ‘सलाईन’
By admin | Updated: December 24, 2016 21:31 IST