लातूर : रस्ता असो की रेल्वे मार्ग अनेक ठिकाणी अतिघाई करणे धोकादायक असल्याचे सांगणारे फलक असतानाही अनेकजण याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करतात आणि अपघाताला बळी पडतात. रेल्वे येत असल्याने फाटक बंद करण्यात आले असतानाही शुक्रवारी सकाळी ११़३७ वाजण्याच्या सुमारास हरंगुळच्या रेल्वेफाटकावर जीव मुठीत घेऊन काही दुचाकी व चारचाकी वाहनधारकही घाई करीत असल्याचे आढळून आले़ दोन वाहनधारकांनी गेटच्या खालून दुचाकी घालून पळ काढला़ दहा मिनिटांसाठीही वाहनधारक थांबायला तयार नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून उघड झाले़ लातुरात रेल्वेचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहे़ मुंबई, पुणे, निजामाबाद, हैदराबाद, कोल्हापूर आदी ठिकाणी रेल्वे जातात़ याशिवाय मालवाहतूक करणारी रेल्वेही आहे़ लातूर शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख मार्गावर उड्डाणपूल असल्याने फाटकाचा फारसा संबंध येत नाही़ अंबाजोगाई रोड, बार्शी रोडवर पूल असून अन्य ठिकाणी फाटक आहेत़ रेल्वेस्थानकापासून हरंगुळ गाव, हरंगुळ स्टेशनजवळ अतिरिक्त एमआयडीसी, बारा नंबर पाटी याठिकाणी फाटक बसविण्यात आले आहे़ रेल्वे येणाऱ्या १० मिनिटे अगोदरच फाटक लावण्यात येते़ मात्र, दहा मिनिटेही थांबायला वाहनधारक तयार नसतात़ शुक्रवारी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटाला हरंगुळ स्टेशननजीकचे फाटक बंद करण्यात आले़ फाटक बंद होत असतानाच एका चारचाकी वाहनधारकाने कर्मचाऱ्यास फाटक बंद करू नको, एक मिनिटात जातो, असे म्हणत अर्धवट फाटकातून मार्ग काढला़ काही वाहनधारक जागेवरच होते़ तेवढ्यात पाठीमागून आलेला एक दुचाकी चालकही थांबायला तयार नव्हता़ त्यानेही फाटकाच्या खालून दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला़ बरोबर ११ वाजून ४५ मिनिटाला रेल्वे येथून निघून गेली़ रेल्वे जायच्या अगोदर दोघांनी फाटकाच्या खालून वाहने काढून जीव धोक्यात घातला़ दरम्यान, कळंब रोडवरील रेल्वे फाटकाच्या बाजूने दुचाकी काढताना अनेकजण आढळून आले. फाटका खालून न काढता गेटच्या बाजूने जाऊन दुचाकी नेण्याचे प्रकार नेहमीच होतात. (प्रतिनिधी)
वाहनधारकांना जीवासाठी दहा मिनिटेही थांबणे होईना !
By admin | Updated: December 24, 2016 00:54 IST