लातूर : विज्ञानातून निर्माण झालेल्या सुख-सुविधा अंगीकारुन आपण जगतो़ वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून वाटचाल केल्यास विवेकशिलता निर्माण होते़ विज्ञानाची कास धरली तरच समाजातील कर्मकांड, अंधश्रद्धा संपुष्टात येईल, असे मत डॉ़ शैलाताई दाभोळकर यांनी येथे व्यक्त केले़ परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्या व सेवानिवृत्त शिक्षिका सुमती जगताप यांचा सत्कार दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात रविवारी झाला़ याप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या़ अध्यक्षस्थानी माजी खा़डॉ़ जनार्दन वाघमारे होते़ मंचावर शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभाग प्रमुख प्रा़डॉ़ मेघा पानसरे, स्वागताध्यक्षा मालती देऊळगावकर, प्राचार्या डॉ़ कुसुम मोरे, वासंती धूत, डॉ़ ममता व्होरा, उषा शिंदे, सविता नरहरे, हेमलता शहरकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी दाभोळकर म्हणाल्या, विज्ञानाची कास धरल्याशिवाय समाजातील कर्मकांड, अंधश्रद्धा संपुष्टात येणार नाही़ महिलांनी लग्न करणे म्हणजे शिक्षण आहे का, याचा त्यांनी विचार केला पाहिजे़ पोटाची खळगी भरणे म्हणजे काम नव्हे़ आपण स्वत:साठी व आपल्या कुटुंबासाठी जगतो़ आपण माणसं आहोत़ समाजातील माणसांसाठीही काम केले पाहिजे़ समाजही आपलाच आहे, ही भावना वृध्दिंगत झाली पाहिजे़ पुरुष म्हणजे नर नव्हे, तर संभाळण्याची ज्यांच्यात धमक आहे तो पुरुष होय़ अध्यक्षीय समारोप करताना माजी खा़डॉ़ जनार्दन वाघमारे म्हणाले, हातात एक पुस्तक व पेन घेऊन शिक्षक काम करतो़ त्याच्यात जग बदलण्याची ताकद आहे़ शिक्षक विद्यार्थ्यांना घडवीत असतो आणि त्यांना घडवीत आपणही घडत असतो़ सुमती जगताप अशाच घडत गेल्या आहेत़ आपण विज्ञानाचे फायदे घेतो पण वैज्ञानिक दृष्टीकोन स्विकारत नाही, ही खरी शोकांतिका असल्याचे ते म्हणाले़ सत्काराला उत्तर देताना सुमती जगताप यांनी आपला जीवनपट उलगडून सांगितला़ शिक्षण, नोकरी आणि सामाजिक कार्यात आलेले अनुभव त्यांनी सांगितले़ कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ़ कुसुमताई मोरे यांनी केले़ यावेळी कुमुदिनी भार्गव, मालती देऊळगावकर यांनी मनोगत व्यक्त केले़ सूत्रसंचालन नयन राजमाने यांनी केले़ वासंती धूत यांनी आभार मानले़
कर्मकांडाला थारा देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2016 00:04 IST