परभणी : मंच कोसळून जखमी झाल्यानंतरही स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून गोपीनाथ मुंडे यांनी आयोजकांचा कुठलाही दोष नाही, त्यांना त्रास देऊ नका, अशा सूचना पोलिसांना केल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांच्या या सूचनेमुळे त्यावेळी आयोजक आणि संयोजक गहिवरुन गेले. एखाद्या वरिष्ठ नेत्याला कार्यकर्त्याबद्दल असलेल्या आत्मियतेचा अनुभव यावेळी परभणीकरांना आला. केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे ३ जून रोजी दिल्ली येथे अपघाती निधन झाल्यानंतर परभणीत कार्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. यानिमित्ताने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा येत आहे. ४ फेब्रुवारी २००४ मध्ये परभणी येथे कोष्टी समाजाचा राज्यव्यापी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास भाजपा नेते गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दिवसभरात पत्रकारांना वेळ मिळू शकला नव्हता. त्यामुळे कोष्टी समाज मेळाव्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पत्रकारांनी त्यांना वेळ मागितला. त्यावर मुंडे यांनी पत्रकारांना मंचावरच बोलावले. या दरम्यान पत्रकारांसमवेतच बीड जिल्ह्यातून आलेले अनेक कार्यकर्ते मुंडे यांना भेटण्यासाठी मंचावर चढले. सुमारे साडेतीनशेच्या आसपास कार्यकर्ते मंचावर आल्याने हा मंच कोसळला आणि यात गोपीनाथ मुंडे जखमी झाले. या घटनेनंतर आयोजक विष्णू कुटे, कोष्टी समाजाचे महाराष्टÑ अध्यक्ष अरुण वरोेडे, पंडितराव इदाते, रमेश घटे यांनी तत्काळ धावपळ करीत मुंडे यांना खाजगी दवाखान्यात दाखल केले. मुंडे यांच्या मानेला जोराचा झटका बसला होता. त्यामुळे एक रात्र त्यांना परभणीतील दवाखान्यात काढावी लागली. उपचार घेत असतानाही त्यांनी पोलिस प्रशासनाला दूरध्वनीवरुन सूचना केल्या. बीड जिल्ह्यातील माझे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मंचावर आल्यामुळे ही दुर्घटना घडली. यात आयोजकांचा कुठलाही दोष नाही. त्यांना तुम्ही त्रास देऊ नका, असे त्यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे यांच्या या आत्मीयतेमुळे त्यावेळी आयोजक गहिवरुन गेले होते.(प्रतिनिधी)
संयोजकांना त्रास देऊ नका
By admin | Updated: June 4, 2014 00:44 IST