लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विषय समित्यांच्या सदस्य निवडीनंतर जिल्हा परिषदेचे कामकाज आता रुळावर आले असून २१ जून रोजी स्थायी समितीची बैठक होणार आहे. तर २९ जून रोजी पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची २१ मार्च रोजी निवड झाल्यानंतर जवळपास अडीच महिने विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड झाली नव्हती. महत्त्वाच्या विषय समित्यांवर आपली वर्णी लागावी म्हणून काही इच्छुक सदस्यांनी अधिकचे अर्ज दाखल केल्याने या विषय समित्यांच्या सदस्यांची निवड प्रलंबित राहिली होती. यामधून मार्ग काढण्यासाठी जि. प. अध्यक्ष उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते व राष्ट्रवादीचे गटनेते अजय चौधरी यांनी काँग्रेस, भाजपा, रासप, शिवसेना आदी पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर नुकतीच विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून विषय समित्यांअभावी ठप्प पडलेले जि. प. चे कामकाज रुळावर आले आहे. याअंतर्गत २१ जून रोजी स्थायी समितीची बैठक होत असून २२ जून रोजी जलसंधारण समितीची बैठक होणार आहे. याच दिवशी शिक्षण समितीचीही बैठक होणार आहे. २९ जून रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पहिली सर्वसाधारण सभा असली तरी ती काही महत्त्वपूर्ण विषयांवर गाजण्याची शक्यता आहे. या सर्वसाधारण सभेची आतापासूनच जि. प. त तयारी सुरु झाली आहे.
जि. प. चे कामकाज रुळावर
By admin | Updated: June 16, 2017 23:29 IST