पोत्रा : पेठवडगाव येथे १२ मार्च रोजी शनिवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला. यामध्ये अनेक घरांसह जिल्हा परिषदेच्या शाळेवरील टिनपत्रे उडाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर ज्ञानार्जन करण्याची वेळ आली आहे.कळमनुरी तालुक्यातील पेठवडगाव येथे १२ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरींचे आगमन झाले. वादळी वाऱ्याचा वेग एवढा तुफान होता की, यामध्ये गावातील अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली आहेत. शिवाय जि.प.प्राथमिक शाळेवरील तीन खोल्यांचे टीनपत्रे उडून गेल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर ज्ञानार्जन करण्याची वेळ आली आहे. शनिवारला सायंकाळी वादळी वाऱ्यात वीज गायब होवून सुसाट वादळाचे आगमन झाले. अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून जात असल्याने गावकऱ्यांची एकच पंचायत झाली. पावसाचा वेग हलका असला तरी वादळी वाऱ्याचा वेग जास्त होता. शेतात शेतकऱ्यांनी अपुऱ्या पाण्यावर मका, ज्वारी, कडोळ या सारख्या जनावरांच्या खाद्याची पेरणी केली होती. उंच आलेले पीक वादळी वाऱ्याने आडवे पडल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, धारधावंडा येथील शाळेच्या किचन शेडवरील टिनपत्रे उडाली आहेत. पेठवडगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या धारधावंडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्वयंपाक खोली (किचन शेड) वरील टिनपत्रे देखील याच वेळेला वादळी वाऱ्यात उडाली. यामध्ये सदरील खोलीमधील शालेय पोषण आहाराचे तांदळाचे पोते व इतर अन्नधान्य पावसाने भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)
जि. प. शाळेवरील टिनपत्रे वादळी वाऱ्याने उडाली
By admin | Updated: March 14, 2016 00:30 IST