विशाल सोनटक्के , उस्मानाबादइच्छा असूनही हाताला काम मिळत नसेल अथवा काम असूनही ते करण्याची इच्छा नसेल. कारण काहीही असो जिल्ह्यातील तब्बल ८ लाख ८३ हजार ६६० जण कसलेही काम करीत नसल्याचे नुकत्याच झालेल्या पाहणीत आढळून आले आहे. एकूणच काम न करणारा ५३.३१ टक्के वर्ग काम करणाऱ्या ४६.६९ टक्के लोकांवर अवलंबून असल्याचेही या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.एखाद्याच्या घरातील कितीजण कार्यरत राहतात यावर त्या कुटुंबाची आर्थिक प्रगती दिसून येते. हीच बाब एखादे गाव, तालुका तसेच जिल्ह्यालाही लागू पडते. उद्योग, व्यवसायाची संधी सहज मिळत नसली तरी अनेकजण प्रयत्नांची पराकाष्टा करुन रोजगाराचे साधन मिळवितात. मात्र अनेकांना संधी असूनही ती मिळविण्यासाठी ते धडपड करतातच असे नाही. पर्यायाने जो वर्ग काम करतो त्याला या नाकर्त्यांचा भार सोसावा लागतो. पर्यायाने आर्थिक उन्नतीमध्ये कुटुंब मागे पडते. हाच नियम एखाद्या गावाला आणि जिल्ह्यालाही लागू होतो. उस्मानाबाद जिल्ह्याचा विचार करता २०११ मध्ये जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ४८,८८७ इतके होते. ते २०१२ मध्ये ५४,८३३ वर पोहोचले. मात्र राज्याच्या दरडोई उत्पन्नाशी उस्मानाबाद जिल्ह्याची तुलना करता, मोठी तफावत असल्याचे दिसून येते. २०१२ मध्ये राज्याचे दरडोई उत्पन्न १,०५,६२३ इतके होते. म्हणजेच जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न हे राज्याच्या दरडोई उत्पन्नाच्या निम्मे असल्याचे दिसून येते. दरडोई उत्पन्न कमी होण्यासाठी अनेक कारणे असली तरी माणसाची कार्यप्रवणता यामध्ये महत्वाचा घटक आहे. आणि यामध्येच जिल्हावासीय कमी पडत असल्याचे दिसून येते.उस्मानाबाद जिल्ह्याची मदार आजही शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे काम करणाऱ्या वर्गामध्ये शेतकरी आणि शेतमजुरांची संख्या इतर उद्योगाच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात २८ लाख ४ हजार २३५ शेतकरी असून, हे सर्वजण काम करणाऱ्या वर्गात मोडतात. यापाठोपाठ क्रमांक लागतो तो शेतमजुरांचा जिल्ह्यात विविध ठिकाणी २ लाख ६५ हजार १६७ मजूर शेतीकामामध्ये स्वत:ला जुंपून घेतात. तर छोट्या मोठ्या वस्तूंच्या निर्मितीचे तसेच दुरुस्तीबरोबरच घरगुती उद्योग करणाराही मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. असे १५ हजार २६१ जण विविध मार्गाद्वारे कार्यप्रवण असून, इतर प्रकारे काम करणाऱ्यांची संख्या १ लाख ३७ हजार २३१ एवढी असल्याचे ही आकडेवारी सांगते. अशा पद्धतीने मुख्य व सिमांतिक काम करणाऱ्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या ७ लाख ७३ हजार ९१६ एवढी असून, त्यांची टक्केवारी ४६.६९ एवढी होते. मात्र काम न करणाऱ्यांची संख्या यापेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात तब्बल ८ लाख ८३ हजार ६६० जण काहीही काम करीत नसून, अंशाची टक्केवारी ५३.३१ टक्के आहे. म्हणजेच काम करणाऱ्या ४६.६९ टक्के लोकांवर या काम न करणाऱ्या ५३.३१ टक्के लोकांचा भार असल्याचे दिसून येते. एकूणच जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवायचे असेल तर बेरोजगारांच्या हातांना काम देण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.
जिल्ह्यात ८ लाख ८३ हजार ऐतखाऊ
By admin | Updated: October 22, 2014 01:17 IST