बीड:जिल्ह्यात ठिकठिकाणी गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन केले जात असल्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून, गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत.जिल्ह्यात ठिकठिकाणी गौण खनिजाचे उत्खनन केले जात आहे. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना अवैध उत्खनन रोखण्यासंदर्भातल्या सूचना नुकत्याच दिल्या आहेत. कारवाईसाठी पथके नेमावीत, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.ज्याठिकाणच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू आहे त्याठिकाणी रात्रीच्या वेळी अवैधरीत्या वाळू उपसा करुन त्याची सर्रास वाहतूक केली जाते. अवैधरीत्या वाळू वाहतूक करीत असताना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे. गेल्या दोन महिन्यात गौण खनिज विभागाने अवैध उत्खनन करणाऱ्यावर अत्यल्प कारवाया केली असल्याची बाब समोर आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना पथके नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाळू उपशासह अनेक ठिकाणी खडी क्रेशर मशीन विनापरवाना सुरू आहेत. याचा शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे. शासनाचा महसूल वाढावा, यासाठी प्रशासनस्तरावर कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईसाठी लवकरच पथकाची स्थापना करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. गौण खनिज विभागाला जिल्हा प्रशासनाने चालू वर्षी ३७ कोटी रुपये महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे आता आगामी काळात महसूल वसुलीचा वेग वाढवावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
अवैध उत्खनन रोखण्यासंदर्भाच्या तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
By admin | Updated: July 18, 2014 01:45 IST