आडूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी अंतरवाली खांडी, कडेठाण, एकतुनी, आडूळ खुर्द, गेवराई ही पाच उपकेंद्रे जोडली असून, ३५ गावांतील नागरिकांसाठी केवळ आडूळ येथेच एकच लसीकरण केंद्र आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातून नागरिक लसीकरणासाठी येऊ लागले आहेत. गुरुवारी ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यासाठी केंद्रात १५० लससाठा उपलब्ध झाला. परंतु येथे नियोजनाचा अभाव असल्याने केंद्रात गोंधळ उडाला. नागरिकांमध्ये व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये वाद सुरू झाले. केंद्रात आरोग्य विभागाचे कर्मचारी धनदांडग्यांना वशिलेबाजीने लसीकरण करीत असल्याचा आरोप संतप्त झालेल्या नागरिकांनी केला.
उपविभागीय अधिकाऱ्यांची केंद्राला भेट
पैठण : फुलंब्रीचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. उद्यापासून नागरिकांसाठी योग्यरीत्या नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या.