वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रात घाणेगाव शिवारातील एका शेतात सांडपाण्याची विल्हेवाट लावणारा टँकर शनिवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने पकडून वाळूज एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधीन केला. या टँकरमधील सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, प्रयोग शाळेच्या अहवालानंतर कारवाईची पुढील दिशा ठरणार आहे.
वाळूज औद्योगिक परिसरातून शनिवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक जात असताना त्यांना घाणेगाव शिवारात एक टँकर जाताना दिसून आले. त्यामुळे पथकाने टँकरवर पाळत ठेवून पाठलाग केला. काही वेळाने हा टँकर घाणेगाव शिवारातील एका शेतात पाण्याची विल्हेवाट लावताना दिसून आला. त्यामुळे पथकाने घटनास्थळी जाऊन सोडलेल्या पाण्याची पाहणी केली असता सदर पाणी फेसाळयुक्त काळसर रंगाचे दिसून आले. टँकरमधील सांडपाणी रसायनयुक्त असल्याच्या संशयावरुन पथकाने टँकर (एमएच-२०, डीई-४७०६) च्या चालकाकडे सदरील पाण्याविषयी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पथकाने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले. कृष्णा विठ्ठल इंचे असे टँकर चालकाचे नाव असून, टँकरमालक जगदिश मोतीराम टाक आणि शेतमालक कृष्णा बनसोडे (रा. घाणेगाव) असल्याचे सांगितले. यानंतर पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करुन टँकरमधील सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. टँकर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वाळूज औद्योगिक क्षेत्रात उघड्यावर सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती मिळाल्यावरुन प्रदूषण नियंत्रण मंडळाला याविषयी पत्र व्यवहार केला होता. असे सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरील टँकरमधील सांडपाणी हे वाळूज एमआयडीसीतील एम सेक्टरमधील एका कंपनीचे असल्याचे समजते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदरील टँकरमधील सांडपाण्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी केलेली कारवाईवाळूज औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील रसायनयुक्त सांडपाणी खाम नदीच्या पात्रात सोडले जात असल्याची माहिती मिळताच तत्काली पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी टँकर जप्त करुन संबंधितांवर गुन्हे दाखल केले होते.