गढी: गेवराई तालुक्यातील गढी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे दोन वर्षापूर्वी पत्रे उडून गेले आहेत. यामुळे अर्धा दवाखाना उघड्यावरच आहे. यामुळे ऊन, वारा, पावसात बसून येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जनावरांवर उपचार करावे लागत आहेत. गढी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात तळेवाडी, वडगावढोक, मिरकाळा, खांडवी आदी परिसरातील शेतकरी आपल्या जनावरांना उपचारासाठी आणतात. मात्र येथे अत्यंत दुरवस्था असल्याने पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पशु मालकांनाही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मागील दोन वर्षांपूर्वी येथील पशु वैद्यकीय दवाखान्यावरील पत्रे उडून गेले आहेत. यामुळे अर्धा दवाखाना उघड्यावर आहे. असे असताना देखील मागील पाच वर्षात येथील समस्येकडे ना जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने लक्ष दिले आहे ना ग्रामपंचायतचे लक्ष आहे. यामुळे पशुंवर उपचार करणे अवघड झाले असल्याचे चित्र येथे पहावयास मिळत आहे. एकंदरीत या दुरवस्थेमुळे परिसरातील पशुधनाला वेळेवर आरोग्य सेवा मिळत नाही. याचा परिणाम पशुधनावर होत असल्याचे येथील ग्रामस्थांनी म्हटले आहे. दवाखाना उघड्यावर असल्याने दवाखान्यातील सर्व रेकॉर्ड चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसात भिजले आहे. तसेच गोळ्या, औषधे देखील भिजले असल्याचे पहावयास मिळते. गढी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारत तात्काळ बांधून द्यावी, अशी मागणी येथील पशुमालकांनी केलेली आहे. ही मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी आर.आर. वादे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, नवीन इमारतीसाठी प्रस्ताव पाठविलेला आहे. मंजुरी मिळताच कामास सुरूवात करू. (वार्ताहर)
पत्रे उडाल्याने दवाखाना उघड्यावर
By admin | Updated: July 26, 2014 00:37 IST