औरंगाबाद : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळ निवडीसाठी घेण्यात आलेल्या आमसभेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या दोन याचिका औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी फेटाळल्या.मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची सर्वसाधारण सभा १० जुलै २०१३ रोजी घेण्यात आली होती. मशिप्र मंडळाची निवडणूक घेण्याचे आदेश सहायक धर्मादाय आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार तत्कालीन अध्यक्ष विठ्ठलराव लहाने आणि सचिव मधुकरराव मुळे यांनी सभेचे आयोजन केले. मात्र एक दिवस आधीच त्यांनी ही सभा रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानंतरही सहायक धर्मादाय आयुक्तांनी ही सभा घेण्याचे निश्चित केले आणि दोन निरीक्षकांची नियुक्ती केली. १७९ सभासदांपैकी १०२ सभासद सभेला उपस्थित, तर अध्यक्ष आणि सचिव गैरहजर होते. सभेत मंडळाच्या अध्यक्षपदी प्रकाश सोळंके, सचिवपदी आ. सतीश चव्हाण यांची व अन्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सभेकरिता दोन निरीक्षक नियुक्त करण्याच्या सहायक धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयास, तसेच सभेच्या वैधतेला मधुकरराव मुळे यांनी खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले. विश्वनाथ तुपे आणि भाऊसाहेब ठोंबरे यांनी अन्य एक याचिका याच विषयावर खंडपीठात दाखल करून नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव आणि अन्य संचालक मंडळाच्या निवडीस आव्हान दिले होते.या दोन्ही याचिकांची एकत्रित सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने नवनियुक्त संचालक मंडळास धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असे अंतरिम आदेश दिले होते. दरम्यान, खंडपीठाने या आदेशात बदल करून मालमत्तांचे हस्तांतरण करणे, मालमत्तेवर बोजा ठेवायचा असेल तर धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेण्याचे आदेश दिले होते.या दोन्ही याचिकांमध्ये उभय पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. गुरुवारी न्यायालयाने दोन्ही याचिका फेटाळण्यात आल्याचे जाहीर केले. यावेळी प्रतिवादी सतीश चव्हाण आणि अमरसिंह पंडित यांच्याकडून अॅड. एन. बी. खंदारे यांनी, त्रिंबक पाथ्रीकर, प्रकाश सोळंके यांच्याकडून अॅड. डी. जे. चौधरी यांनी बाजू मांडली. शेख अहेमद शेख चाँद यांच्याकडून अॅड. महेश देशमुख यांनी, तर अनिल नखाते यांच्याकडून अॅड. व्ही. डी. गुणाले, डॉ. अविनाश येळीकर यांच्याकडून अॅड. व्ही. आय. ठोले यांनी बाजू मांडली, तर याचिकाकर्त्यांकडून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. विजयसिंह थोरात यांनी बाजू मांडली.
मशिप्रमं संचालक मंडळ निवडीला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या
By admin | Updated: December 7, 2014 00:20 IST