ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. ११ : मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत भाजपाच्या संचालकांनी जाधववाडीतील कृउबा समितीचे सभापती संजय औताडे यांच्यावर पुन्हा एकदा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची मागणी आज जिल्हाधिका-यांकडे केली. यामुळे आता येत्या काळात बाजार समितीमधील राजकीय वातावरण तापणार आहे हे निश्चित.
भाजपाच्या नाकावर टिचून काँग्रेसचे संजय औताडे ५ आॅगस्ट २०१५ रोजी जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदावर विराजमान झाले होते. तेव्हापासून काँग्रेस व भाजपामध्ये एकामेकावर कुरघोडी करण्याचे राजकारण आजमतीपर्यंत सुरु आहे. औताडे कोणालाही विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात, त्यांनी मनमानी कारभार सुरु केला आहे. संचालकांना आरेरावीची भाषा वापरणे असा त्यांच्यावर आरोपाचा ठपका ठेवून ११ महिन्यानंतर पुन्हा एकदा भाजपाच्या संचालकांनी सभापतींवर अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे उपसभापती भागचंद ठोंबरे यांनी निवेदन दिले यावेळी नगरसेवक राजू शिंदे यांची उपस्थिती होती.
निवेदन १३ संचालकांचे, सह्या १२ जणांच्या निवेदनावर १३ जणांचे नाव होते मात्र, प्रत्यक्षात १२ जणांनीच सह्या केल्या होत्या. काँग्रेसला पाठींबा देणारे तीन संचालक फुटल्याचा दावा यावेळी करण्यात आला. यानंतर उपसभापती यांनी उपनिबंधक कार्यालय (सहकार) येथेही अविश्वास प्रस्ताव आणावा या निवेदनाची एक पत्र दिली. यामुळे आता पुन्हा बाजारसमितीमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. मागील वेळेस अविश्वास ठराव बारगळला होता पण आता संजय औताडे यांना सभापतीपदावरून खाली खेचण्यासाठी भाजपाने पुन्हा एकदा शडू ठोकला आहे.