जालना : येथील नगर भूमापन कार्यालयातील परिरक्षण भूमापक दोन महिन्यांपासून गायब असल्याचे वृत्त ‘लोकमत’ च्या १५ आॅगस्ट रोजीच्या अंकातून प्रसिद्ध होताच या कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत स्थानिक अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यामुळे सदर गायब कर्मचारी कामावर रूजू झाले असून अनेक प्रलंबित कामे मार्गी लागण्याचा मार्ग सुकर झाला आहे. शहरात एकूण ५६ हजार मालमत्ताधारक आहेत. यापैकी न.भू.क्रमांक २०० ते २९९, ६७५१ ते १०८६३ तसेच १०८६४ ते ११५०० मधील काही प्रकरणांची कामे परिरक्षणभूमापक एस.डी. वाहुळे यांच्याकडे सोपविलेली आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून ते कार्यालयात नियमित हजर नसल्याने अनेक मालमत्ताधारकांना दररोज नगर भूमापन कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या.या पार्श्वभूमीवर या कार्यालयातील अधिकाऱ्यांकडूनही व्यवस्थित उत्तरे दिली जात नव्हती. गेल्या महिनाभरात जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्याकडे किमान १० तक्रारीही गेल्या होत्या.याबाबतचे वृत्त लोकमतच्या अंकातून प्रसिद्ध होताच नगर भूमापन कार्यालयाच्या औरंगाबाद कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जालना येथील स्थानिक अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. आजारपणामुळे संबंधित कर्मचारी गैरहजर राहिल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी सदर कर्मचारी हजर झाल्याने अनेक प्रलंबित कामांसाठी चकरा मारणाऱ्या नागरिकांनीही कार्यालयात गर्दी केली होती. (प्रतिनिधी)मालमत्ताधारकांना पीआरकार्डची नक्कल मिळविण्यासाठी सेतू सुविधा केंद्रात अर्ज करावा लागतो. या नक्कलची प्रत केव्हा मिळणार, याची तारीखही या केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून दिली जाते. मात्र प्रत्यक्ष नक्कल घेण्यास गेल्यानंतर संबंधित कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. ४कार्यालयात गेल्यानंतर संगणक खराब आहे, संबंधित कर्मचारी हजर नाही, आणखी दोन दिवस लागतील अशी वेगवेगळी उत्तरे देऊन नागरिकांना चकरा मारण्यास भाग पाडले जाते. हा प्रकारही ‘लोकमत’ ने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास यापूर्वीच आणून दिलेला आहे.
नगर भूमापनचा गायब कर्मचारी अखेर हजर
By admin | Updated: August 18, 2014 00:58 IST