उदगीर : नजीकच्या काळातील निवडणुकांद्वारे उदगीरला येणाऱ्या आमच्या वाटा बंद झाल्या आहेत़ आता कृषी उत्पन्न बाजार समितीचा एकमेव मार्ग राहिला आहे़ हे सत्ताकेंद्र शेतकरीहिताचा विचार करणाऱ्या आमच्या प्रमाणिक पॅनलच्या हाती देऊन उदगीरला येणारी एक तरी वाट आमच्यासाठी ठेवा, असे भावोद्गार माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी शनिवारी उदगीरात काढले़उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील काँग्रेस प्रणित पॅनलच्या प्रचारार्थ शनिवारी उदगीरात सभा झाली़ मंचावर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्रीपतराव काकडे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, विश्वनाथ बेळकोणे, कल्याण पाटील, रामराव बिरादार, गोविंदराव भोपणीकर, आबासाहेब पाटील, श्रीशैल्य उटगे, मुन्ना पाटील, विक्रांत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी दिलीपराव यांनी माजी सभापती शिवाजी हुडे यांचे नाव न घेता ते आमच्या पॅनलमध्ये असते तर मी प्रचारालाही आलो नसतो, असे सांगत दिलीपरावांनी हुडे यांच्यावर टीका केली़ बस्वराज पाटील नागराळकर म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करीत नाही़ उद्योगपतींचे कर्ज मात्र झटक्यात माफ केले जाते़ शिवाय, येत्या काही दिवसात पालकमंत्र्यांचे साकोळ येथील कारखान्यावर असलेले ८० कोटींचे कर्ज बँकाच्या ‘वन टाईम सेटलमेंट’ योजनेद्वारे माफ केले जाईल, असा दावा केला़ काँग्रेस प्रणित पॅनलला विजयी करुन विजयाची गुढी उभी करा, असे आवाहनही त्यांनी केले़
उदगीरला यायला एक तरी वाट ठेवा : दिलीपराव देशमुख
By admin | Updated: March 25, 2017 23:11 IST