औरंगाबाद : सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात झालेली लक्षणीय वाढ पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. सायबर गुन्हे उघडकीस आणणे, हे पोलीस यंत्रणेसमोर आव्हान बनले आहे. आता मात्र सायबर गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आले आहेत. शहर व ग्रामीण पोलीस दलात अत्याधुनिक सायबर लॅब कार्यान्वित करण्यात आल्या असून, स्वातंत्र्यदिनी त्यांचे उद्घाटन झाले.माहिती तंत्रज्ञानाचा समाजातील सर्वस्तरातून वापर होत आहे. गुन्हेगारांनीही हे तंत्र आपलेसे केले आहे. नागरिकांची आॅनलाईन आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. आक्षेपार्ह छायाचित्रे, प्रक्षोभक संदेश पाठविण्यासाठी फेसबुक, टिष्ट्वटरसारख्या ‘सोशल मीडिया’चा वापर समाजकंटकांकडून होत आहे. सायबर गुन्हे लवकर उघडकीस यावेत, आरोपींविरुद्ध न्यायालयात ‘डिजिटल’ पुरावे सादर करणे शक्य व्हावे, यासाठी पोलीस आयुक्त आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयास सुसज्ज ‘सायबर लॅब’ उभारण्यात आल्या आहेत.दोन्ही सायबर लॅबचे उद्घाटन पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले. महापौर त्र्यंबक तुपे, आ. संजय शिरसाठ, आ. अतुल सावे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम.एम.शेख, आयुक्त अमितेशकुमार, जिल्हाधिकारी निधी पांडे यांची आयुक्तालयातील कार्यक्रमास उपस्थिती होती. अधीक्षक कार्यालयातील कार्यक्रमास खा. चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, उज्जवला बनकर आदी उपस्थित होते.
न्यायालयात सादर होणार ‘डिजिटल’ पुरावे
By admin | Updated: August 17, 2016 00:53 IST