बापू सोळुंके, औरंगाबादघाटीत दाखल होणाऱ्या किडनीविकाराच्या रुग्णांवर खुराड्यासारख्या वॉर्डात डायलिसिस केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे घाटीत उभारण्यात आलेल्या कृत्रिम किडनी प्रत्यारोपण विभागाच्या इमारतीमध्ये हे डायलिसिस युनिट स्थलांतरित केले जाणार होते. किडनीविकाराच्या रुग्णांना डॉक्टर डायलिसिसचा सल्ला देतात. अनेक रुग्णांना आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावे लागते. त्याशिवाय ते जिवंत राहूच शकत नाहीत. खाजगी रुग्णालयात येणारा खर्च गरीब रुग्णांना परवडत नाही. ते घाटीत दाखल होतात. घाटीत अनेक वर्षांपासून स्वतंत्र डायलिसिस युनिट कार्यरत आहे. हे युनिट ज्या वॉर्डात आहे त्या वॉर्डात जाऊन पाहिले की, तो वॉर्ड आहे अथवा एखाद्या जनावरांचे खुराडे, असा प्रश्न पडतो. या वॉर्डात कोणत्याही सुविधा नाहीत. रुग्णांसह डॉक्टर्स आणि कर्मचारीसुद्धा या वॉर्डाला वैतागलेले आहेत. कारण या वॉर्डात संडास, बाथरूमसुद्धा नाही. रुग्ण आणि डॉक्टरांना अन्य वॉर्डांमधील शौचालयात जावे लागते. पावसाळ्यात हा वॉर्ड गळत असतो. उन्हाळ्यातील उकाड्याने रुग्णासह डॉक्टर्स त्रस्त असतात. प्रशासनाकडून हे युनिट स्थलांतरित करण्यासंदर्भात हालचाल केली जात नाही.दरमहा २०० डायलिसिसमराठवाडा आणि शेजारील जिल्ह्यांतून रोज सरासरी १० ते १२ रुग्ण डायलिसिस करण्यासाठी घाटीत येतात. दोन्ही किडन्या खराब झालेल्या रुग्णांना किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे हा एकमेव उपाय असतो. शस्त्रक्रिया करेपर्यंत डायलिसिस करावे लागते. काही रुग्णांना प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतरही डायलिसिस करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. प्रशासन म्हणते, महिनाभरात होईल स्थलांतरवैैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर म्हणाले की, कृत्रिम किडनी प्रत्यारोपण इमारतीत महिनाभरात डायलिसीस युनिट स्थलांतरित केले जाईल. त्यापूर्वी या इमारतीशेजारी असलेला बायोवेस्ट कचरा अन्य ठिकाणी टाकण्यासाठी आम्ही नवीन जागेचा शोध घेत आहोत.
खुराड्यासारख्या वॉर्डात डायलिसिस
By admin | Updated: December 26, 2014 00:16 IST