पाटोदा : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा यासाठी येथील तहसीलवर गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणला होता. केंद्र शासनाने ‘धनगड’ समाजाला एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गात आरक्षण दिले आहे. महाराष्ट्रात मात्र ‘धनगर’ असा उल्लेख होत असल्याने येथील समाज एसटी प्रवर्गात येत नाही.हा केवळ शब्दांचा खेळ असल्याने धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा, अशी मागणी यावेळी धनगर समाज तालुका कृती समितीच्या आंदोलकांनी केली. धनगर समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनही ही मागणी आहे. मात्र, मागणी मान्य होत नसल्याने धनगर समाजावर अन्याय होत असल्याची भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धनगर समाज आहे. या समाजातील अनेक कुटुंबिय दारिद्र्यात आहेत. अशा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी एसटीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी मोर्चेक ऱ्यांनी केली. विरोधकांनी सत्तेवर येण्यासाठी व सत्ताधाऱ्यांनी सत्ता हाती ठेवण्यासाठी धनगर समाजाचा उपयोग करू नये, असे आवाहन यावेळी मल्हार सेना जिल्हाध्यक्ष विष्णू देवकते यांनी केले. यावेळी सुरेश काळे, अंगद भोंडवे, देविदास शेंडगे, विष्णू घोलप, प्रकाश सोनसळे, राजेंद्र भोंडवे, अमोल तरटे, उद्धव दरेकर, शिवाजी राऊत, जब्बार पठाण आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा
By admin | Updated: August 1, 2014 01:05 IST