जालना : घाणेवाडी जलाशयाचे पाणी किमान महिनाभर पुरेल असा दावा नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मुख्याधिकाऱ्यासंह पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांनी घाणेवाडी जलाशयाची पाहणी केली. घाणेवाडी जलाशयातून नवीन जालना भागातील एक लाख पेक्षा अधिक नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रत्यक्षात जलाशयातील पाणी पातळी पाहता हे पाणी महिनाभर पुरेल असा अंदाज नाही. मात्र, मुख्याधिकारी तसेच पाणीपुरवठा विभागाचे अभियंता दासवाड यांनी तलावात पाणी पातळी कमी असली तरी हे पाणी एक महिना सहज पुरेल, असे सांगितले. नवीन जालना भागाला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होतो. घाणेवाडी जलाशयात मोठे खड्डे असून तेथे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. जालना शहरात एप्रिल व मे महिन्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईसाठी नगर पालिकेने १ कोटी १० लाखांचा पाणीटंचाई आराखडा विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. मात्र, कृती आराखडा पाठवून महिना उलटला तरी अद्यापही या टंचाई आराखड्यास मंजुरी मिळाली नाही. मंजुरी कशामुळे रखडली याबाबत पालिकेकडून काहीही सांगितले जात नाही. दरम्यान, अ वर्गाची नगर पालिका असल्याने शहरासाठी टँकर मिळणार नाही. त्यामुळे नागरिकांना खाजगी टँकरवरच आपली तहान भागवावी लागणार आहे.
‘घाणेवाडी’चे पाणी महिनाभर पुरेल
By admin | Updated: March 23, 2016 01:04 IST