उस्मानाबाद : काही बँकांकडून पीक कर्जावर जादा व्याजदर वसूल केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांना संबधित बँकेना भेटी देऊन तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध बँकाची तपासणी केली होती. यात अनेक शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर जादा व्याजदर लावून कोट्यवधी रुपये वसूल करण्यात आले होते. यातील दोन कोटी संबधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पुन्हा जमा करण्यात आले आहेत.२०१२-१३ या वर्षासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. परंतु, अनेक बँकांनी शेतकऱ्यांना सात टक्के व त्याहीपेक्षा अधिक व्याज अकारल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी याची गंभीर दखल घेत अशा बँकांची चौकशी करण्याची पथकांची स्थापना केली होती. पथकांनी केलेल्या चौकशीत शेतकऱ्यांच्या तक्रारीप्रमाणे प्रकार घडल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार ज्या बँकांनी अतिरिक्त व्याज घेतले आहे, अशा बँकांनी ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, असे निर्देश दिले होते. तसेच सदरील कार्यवाहीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाकडे अहवाल आला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल दोन कोटी रूपये जमा झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर जादा व्याज व सेवा शुल्क लावले आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर बँकेने पैसे जमा केले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी सदरील बँकेची लेखी तक्रार द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन कोटी रुपये जमा
By admin | Updated: November 3, 2014 00:39 IST