कडा (जि. बीड) : तिसऱ्यांदा निवडून येत हॅटट्रीक करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल, अशी परिस्थिती आहे. महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर हे बीड जिल्ह्यातील मतांवर बहुमत सिद्ध करतील, एवढे पहिल्या पसंतीचे मतदान जिल्ह्यातून बोराळकरांना केले जाणार असल्याचे खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी सांगितले.
शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी बीड जिल्ह्यातील कडा येथील आनंदराव धोंडे, बाबाजी महाविद्यालयात शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील विविध कर्मचाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी खा. डॉ. मुंडे बोलत होत्या. मागील बारा वर्षात पदवीधर व शिक्षक मतदारसंघ यांच्याकडे असताना संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. या आमदारांना निवडणूक आली तेव्हाच शिक्षक आठवतात. तेही त्यांचा प्रचार करण्यासाठी व निवडणूक संपल्यानंतर हे प्रश्न सोडवणे तर दूर, बोलायला देखील यांच्याकडे वेळ नसतो. यावेळी कडा, आष्टी, बीडसह मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी ठरवले की, ह्या समस्या सोडवण्यासाठी शिरीष बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मतदान करून विजयीच नव्हे तर बहुमताने विजयी करणार असल्याचे ठरविल्याचे डॉ. मुंडे यांनी सांगितले.
चौकट
स्वत:च्या संस्था मोठ्या केल्या
माजी आमदार भिमराव धोंडे म्हणाले , विद्यमान आमदाराने निवडून आल्यावर शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडवण्याऐवजी स्वतः च्या शिक्षण संस्था मोठ्या करण्यासाठी काम केले. यामुळेच शिक्षण क्षेत्राची पीछेहाट झाली. यामुळे या क्षेत्रातील लोकांनी ठरवले आहे की, विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल व बाेराळकर विजयी होतील, असेही धोंडे यांनी सांगितले. उमेदवार शिरीष बोराळकर म्हणाले, माझी एकही शिक्षण संस्था नाही. शिक्षण संस्था ही युवकांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी वापरली पाहिजे. यावरच देशाचे भवितव्य अवलंबून असते. शिक्षण संस्थामधून राष्ट्रीय खेळाडू, आय.पी.एस. अधिकारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, उद्योजक, संशोधक तयार झाले पाहिजे. यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा शब्द देतो, असेही बोराळकर यांनी सांगितले.