उस्मानाबाद : ग्राहकांना घरपोच सेवा पुरविणे एजन्सीधारकांची जबाबदारी असून, ती सुरक्षित पार पाडावी, असे आदेश अपर जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले असले तरी जिल्ह्यातील वाशी, उमरगा, लोहारा तालुक्यात मात्र बहुतांश वेळा या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. वाशीच्या ग्राहकांना दोन ते तीन किमी अंतरावरून तर उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्राहकांना तालुक्याच्या ठिकाणी येवून गॅस सिलिंडर खरेदी करावे लागत आहे. लोहारा तालुक्यात तर अधिकृत एजन्सीच नसल्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उमरगा : तालुकयातील ९६ गावांत गॅस सिलिंडर पुरविण्यासाठी उमरग्यात एकच एजन्सी कार्यरत असून, ग्रामीण भागातील ग्राहकांना तालुक्याच्या ठिकाणी येवूनच सिलिंडरची खरेदी करावी लागत असल्याचे दिसत आहे. तालुक्यात पंधरा हजार ग्राहकांनी स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनची नोंदणी केली असून, येथील एजन्सीमार्फत दिवसाकाठी अडीचशे ते तीनशे ग्राहकांना सिलिंडरचा पुरवठा केला जातो. परंतु, अनेकवेळा अधिकृत नोंदणी करूनही ग्राहकांना तासन्तास सिलिंडरची वाट पाहत थांबावे लागत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील गॅसधारकांना एका टाकीसाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. तर काही ग्राहक अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा गैरवापर करीत असल्यामुळे काहीवेळा टंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबत वितरक कैलास शिंदे म्हणाले, घरगुती गॅसधारकांना नियमाप्रमाणेच टाक्यांचे वाटप केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. सिलिंडरचा गैरवापर होवू नये, यासाठी एजन्सीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सूचना लावण्यात आली असून, गैरवापराबाबत कारवाईसाठी पोलिस निरीक्षकांकडे मागणीही करण्यात आली आहे. मागणी वाढल्याने काहीवेळा टंचाई निर्माण होत असली तरी ग्राहकांच्या मागणीप्रमाणे घरपोच सेवा देणे नियमित सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)लोहाऱ्याची सेवा सबडिलरवर लोहारा : लोहारा हे तालुक्याचे ठिकाण असून, येथे अडीच हजारावर गॅसचे ग्राहक आहेत. असे असले तरी येथे कुठल्याच गॅस कंपनीचा एकही अधिकृत वितरक नाही. त्यामुळे सबडिलरमार्फत येथे गॅस पुरविला जात असल्याने घरपोच सेवा तर नाहीच. शिवाय, ग्राहकांना ठराविक किमतीपेक्षाही अधिक पैसे मोजावे लागत आहेत.लोहारा शहराची लोकसंख्या पंधरा हजारांच्या आसपास असून, येथे पाच सबडिलरमार्फत गॅस सिलिंडर पुरविले जाते. हे सबडिलर सास्तूर, जेवळी, उमरगा, तुळजापूर व लोहारा येथील गॅस एजन्सीकरून सिलिंंडर आणून त्याची ग्राहकांना विक्री करतात. यासाठी ग्राहकांना सिलिंडरच्या मूळ किमतीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच अचानक सिलिंडर संपल्यास अनेक वेळा तातडीने नवे सिलिंडर उपलब्ध होत नाही. अशा वेळी ग्राहकांना जादा पैशांचा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे येथे अधिकृत एजन्सी नियुक्तीची मागणी होत आहे. तर घरपोच सिलिंडर पोहोचविण्याबाबत जिल्हाधिकऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विकास घोडके यांनी केली आहे. (वार्ताहर)तीन किमीवरून वाहतूकवाशी : शहरासह ग्रामीण भागात घरपोच गॅस सिलिंडर पुरविले जात नसल्यामुळे ग्राहकांना दोन ते तीन किमी अंतरावरून स्वत: जाऊन सिलिंडर आणावे लागत असल्याचे चित्र आहे.वाशी शहरात कार्यरत असलेल्या एकमेव गॅस कंपनीचे गोडाऊन शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. या कंपनीचे तालुक्यात तीन हजार आठशे ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांना पारा रोडवरील गॅस गोडावूनमध्ये जाऊन टाकी आणावी लागत आहे. याबाबत गॅस एजन्सी चालकाकडे चौकशी केली असता ग्रामीण भागात घरपोच योजना लागू नसल्याचे व आम्हीही घरपोच सेवेचे पैसे ग्राहकांकडून घेत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यात एच.पी. कपंनीचेही काही ग्राहक असून, त्यांना कळंब येथून सिलिंडर आणावा लागत असल्याचे समजते. शहरातील अनेक व्यावसायिक घरगुती वापराच्या गॅसच्या टाक्या वापरात येत असल्याचेही दिसून येत आहे. परिणामी, अनेकवेळा घरगुती वापरासाठीही ग्राहकांना सिलिंडर उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागातील गॅसधारकांना शहरी भागाप्रमाणे टाक्या घरपोच मिळाव्यात, असे गॅसधारकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
तालुक्याच्या ठिकाणीही घरपोच सेवेचा बोजवारा
By admin | Updated: June 8, 2014 00:56 IST