उस्मानाबाद : उस्मानाबादसह लातूर जिल्ह्यासाठी संयुक्तरित्या येथे चालविण्यात येणाऱ्या टपाल विभागाचे विभागीय मुख्यालय प्रशासनाने १३ एप्रिल रोजी रातोरात लातूरला हलविल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेने दिली. यामुळे नागरिकांसह कर्मचाऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.१९७२ पासून उस्मानाबाद येथे हे कार्यालय कार्यान्वित होते. उस्मानाबादमधून लातूर जिल्हा स्वतंत्र झाल्यानंतर या जिल्ह्यासाठी विभागीय टपाल कार्यालयाची निर्मिती होणे अपेक्षित होते. परंतु प्रशासनाने उस्मानाबाद येथीलच टपाल कार्यालय लातूरला हलविण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर-२०१६ मध्ये याची कुणकुण टपाल कर्मचारी संघटनेला लागल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांना निवेदन दिले होते. यावर आ. पाटील यांनीही औरंगाबाद येथील जनरल पोस्ट मास्तर यांच्याशी संपर्क साधून अशा प्रकारचा प्रस्ताव मंजूर न करण्याचे सूचविले होते. यावर पोस्ट मास्तरांनी असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु सर्वांना अंधारात ठेवत हे कार्यालय लातूरला हलविल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वास्तविक अशा प्रकारच्या स्थानांतर करण्यासाठी पुरेसा अवधी देणे आवश्यक होते. तसेच ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी ही बाब अगोदर जाहीर करायला हवी होती. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना स्वतंत्र टपाल विभागीय कार्यालय आहे. एवढेच नाही तर सोलापूर (सोलापूर व पंढरपूर), नाशिक (मालेगाव व नाशिक), जवळगाव (भुसावळ व जळगाव) यांसारख्या अनेक जिल्ह्यात दोन टपाल विभाग कार्यरत आहेत. लातूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र टपाल विभागाचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून वरिष्ठ पातळीवर रखडला आहे. त्याबाबत निर्णय घेण्याऐवजी प्रशासनाने उस्मानाबाद येथील कार्यालय लातूरला स्थलांतरित करून जिल्ह्यावर अन्याय केल्याची भावना संघटनेने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
विभागीय टपाल कार्यालय रातोरात लातूरला हलविले..!
By admin | Updated: April 16, 2017 23:20 IST