लातूर : विस्तारीत एमआयडीसीतील सामाजिक न्याय विभागाच्या एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहात ३४९ विद्यार्थ्यांना ४ डिसेंबर रोजी अन्नातून विषबाधा झाली होती. या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यासाठी पथक नेमले होते. मात्र या पथकाने अद्याप चौकशीचा अहवाल सादर केला नाही. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे १ हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील युनिट क्र. १, २, ३ आणि ४ मधील ३४९ मुला-मुलींना उलट्या, मळमळ झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, भोजन ठेका असलेल्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. परंतु, सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्तांनी वसतिगृहावर देखरेख असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीसाठी लातूर, उस्मानाबाद, नांदेड येथील अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले होते. या पथकाने दोनवेळा वसतिगृहाला व्हिजीट करून चौकशी केली असल्याचे सांगितले जाते. मात्र एक महिना उलटत आला तरी अद्याप चौकशी पूर्ण झाली नाही. अन्न चव नोंदवही, वसतिगृहात त्या दिवशी कोणते कर्मचारी ड्युटीवर होते, अन्नाची चव घेतली होती का? या सर्व अनुषंगाने या पथकाकडून चौकशी होणार आहे. मात्र अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झाला नाही.(प्रतिनिधी)
विषबाधा प्रकरणाची विभागीय चौकशी लटकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2017 23:57 IST