वडवळ : चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यूचा ज्वर सुरू झाला आहे़ यात एकाचा लातूरच्या खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली़ वडवळ नागनाथ येथील प्रतिक प्रकाश बावगे (१७) हा डेंग्यूच्या आजाराने फणफणत होता़ शनिवारी त्याला उपचारासाठी एका खाजगी रूग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला़ तसेच अक्षय सुदर्शन कुलकणी (७) याच्यावरही खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ तसेच अपेक्षा राजकुमार उस्तुमे, (९) हिच्यासह अन्य एकावर उपचार सुरू आहेत़ गेल्या आठ दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे़ परंतु याकडे आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष दिसून येत आहे़वडवळ येथे शासकीय आयुर्वेदिक दवाखाना आहे़ मात्र गेल्या दीड वर्षापासून डॉक्टर नसल्याने गैरसोय आहे़ आरोग्य सेवकालाही झरी व वडवड उपकेंद्राचा पदभार दिल्याने गावातील नागरिकांचे मात्र हाल होत आहेत़ परिणामी रूग्णांना लातूर व चाकूर येथील रूग्णालयात धाव घ्यावी लागत आहे़ याबाबत ग्रामसेवक पी़व्ही़रेड्डी व सरपंच भगवान लोखंडे म्हणाले, स्वच्छते विषयीजनजागृजी करून कोरडा दिवस पाळण्याचे सक्ती करण्यात येईल़ जानवळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ़वाय़एस़दहीफळे म्हणाले, आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामाला लाउन अॅबेटींगची फवारणी करण्यात येईल़ शिवाय नागरिकांनीही स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी़ आपल्या परिसरात साचलेले पाण्याचे डबके, डासांचे उत्पादन कमी करण्यासाठी एक दिवस कोरडा दिवस पाळावा़
डेंग्यूसदृश्य आजाराने एकाचा मृत्यू
By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST