औंढा नागनाथ : तालुक्यातील पिंपळदरी येथे मागील आठ दिवसांपासून डेंग्यूची साथ सुरू असून, यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी उपचारापूर्वीच मरण पावला. तर त्याच शाळेतील आणखी दोन विद्यार्थ्यांना त्याची लागण झाली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने गावामध्ये १५० जणांचे रक्तनमुने घेण्यात आले आहेत. आतापर्यंत १५ संशयितांचे रक्तनमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी हे एक आदिवासीबहुल गाव असून, या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तेथेच जि.प.प्राथमिक शाळा स्वतंत्र इमारतीमध्ये आहे. या शाळेमध्ये इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत असलेला संदेश पुंडगे यास २६ आॅगस्ट रोजी शाळेत अचानक ताप आल्याने त्याला उपचारासाठी रूग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. यानंतर याच वर्गातील विकास डुकरे, प्रतीक्षा संजय घोंगडे यांना देखील ताप येत असल्याने शिक्षकांनी पालकांना बोलावून सल्ला दिल्यावरून पालकांनी मुलांच्या रक्तांची तपासणी केली असता, त्यांना डेंग्यूचा ताप असल्याचे निष्पन्न झाले. प्रतीक्षा घोंगडे हिच्यावर नांदेड तर विकास डुकरे याच्यावर हिंगोलीत उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)
डेंग्यूची साथ; विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Updated: September 4, 2014 00:19 IST