हिंगोली : औंढा तालुक्यातील पिंपळदरी, हिंगोली तालुक्यातील नर्सीनंतर आता माळहिवरा आणि इंचा येथेही डेंग्यूचा रूग्ण आढळला. दोन्ही गावातील रूग्णांवर मागील चार दिवसांपासून शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंगोली तालुक्यातील तिसरी घटना समोर आली असताना अधिकाऱ्यांना मात्र त्याचा पत्ता नाही. १२ सप्टेंबरपासून इंचा येथील दत्तराव नामदेवराव पडघन (वय ४०) डेंग्यूच्या आजारावर एका खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. आजघडीला त्यांची प्रकृत्ती सुधारली आहे. मध्यंतरी त्यांचा रक्तदाब कमी झाला होता. उपचाराअंती तो योग्य होऊन रूग्ण जवळपास बरा झाला. दुसरीकडे माळहिवरा येथील मीरा गजानन जाधव (वय ३०) यांच्यावरही उपचार सुरू आहेत. सुरूवातील चेहरा आणि अंगावर सूज आली होती. आता त्या बऱ्या असून पांढऱ्या पेशीही चांगल्या असल्याची माहिती डॉ. सारंग पाठक यांनी दिली. रूग्णांवर डॉ. अतुल पवार, डॉ. अमोल धुमाळ, डॉ. संजय सरतापे, डॉ. सचिन बगडिया, डॉ. राजेश धामने उपचार करीत आहेत. पिंपळदरीच्या प्रकरणावरून आरोग्य विभागाने धडा घेतला नाही. हिंगोली तालुका आरोग्य विभागही औंढ्याप्रमाणे साखरझोपेत आहे. मात्र ग्रामपंचायतींची उदासीनताही यानिमित्ताने समोर येत आहे. अनेक गावांत स्वच्छतेचा अभाव व शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याचे समोर येत आहे. या दोन्ही विभागांनी समन्वयाने काम करून साथ प्रतिबंधावर उपाय करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
हिंगोली तालुक्यात आणखी दोघांना डेंग्यू
By admin | Updated: September 17, 2014 00:20 IST