औरंगाबाद : दोन महिन्यांपासून लॉकडाऊन असलेली बाजारपेठ १ जूनपासून अनलॉक करण्याची मागणी शहरातील २५ हजार व्यापाऱ्यांच्यावतीने जिल्हा व्यापारी महासंघाने केली आहे.
यासंदर्भात व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे '' ब्रेक द चेन'' सुरू होऊन दोन महिने उलटले. यात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून शासनाला सहकार्य केले. या काळात व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.
राज्य सरकारकडून अजूनही व्यापारी वर्गासाठी कोणतेही आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले नाही. मालमत्ता कर, वीज बिल, जीएसटीसह अन्य करात कोणतीही सूट दिली नाही.
दुकानातील कामगारांना पगार, दुकान भाडे, स्वतःचा घर खर्च भागवणे, औषधोपचार खर्च, कर्जावरील व्याज, त्यात पावसाळ्यापूर्वीची करायची देखभाल दुरुस्ती असे अनेक कामे प्रलंबित आहेत. आता जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. याचा विचार करून १ जूनपासून सर्व दुकाने उघडण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने द्यावी, असे निवेदनात म्हटले. महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, लक्ष्मीनारायण राठी, जयंत देवळाणकर, असंतोष कावले यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
चौकट
९ तास दुकाने उघडण्याची परवानगी द्या
१ जूनपासून सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी. दररोज ९ तास बाजारपेठ उघडी राहिली तर एकदम गर्दी होणार नाही. कोरोनासंदर्भात दिलेले संपूर्ण नियमाचे व्यापारी पालन करतील, असेही निवेदनात नमूद आहे.