करमाड : कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याच्यादृष्टीने करमाड येथे बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांच्या पथकाने भेट दिली. त्यावेळी करमाड ग्रामपंचायतीच्यावतीने येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी केली.
जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांच्यासह रामराव शेळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके, नायब तहसीलदार प्रभाकर मुंडे, सहायक गटविकास अधिकारी गायके, तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत दाते आदींच्या पथकाने बुधवारी सकाळी करमाड येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली.
गावातील कोरोना रुग्णांची संख्या, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, त्यांचे पालन, लसीकरण वाढवणे आदीच्या त्यांनी सूचना केल्या. यावेळी तालुक्यातील कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी करमाड येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर उभारावे, अशी मागणी सरपंच कैलास उकर्डे, शिवसेना तालुका अध्यक्ष जिजा कोरडे, उपसरपंच रमेश कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य दत्ता उकर्डे, कृष्णा उकर्डे, दत्ता कोरडे, सय्यद राऊफ, प्रवीण मुळे, सुनील तारो, सय्यद कदीर, बाबासाहेब कुलकर्णी, साळुबा कुलकर्णी, फिरोज मिर्झा आदींनी केली.