औरंगाबाद : गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चटोपाध्याय वेतनश्रेणीचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने निर्गमित केले आहेत. त्या शिक्षकांना सदर वेतनातील दोन वर्षांची थकबाकी मिळण्यासाठी वाढीव अर्थिक तरतूद तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख व मुख्य वित्त व लेखाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाभरातील ३४६ शिक्षकांना चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी व १२२ शिक्षणसेवकांना नियमित वेतनश्रेणी जिल्हा परिषदेने उशिरा का होईना देऊ केली आहे; परंतु तालुका पातळीवर या फरकाच्या वेतनासाठी आर्थिक तरतूद नसल्याचे शिक्षकांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे जि.प.ने जिल्हाभरासाठी सुमारे ३ कोटी रुपयांची वाढीव अर्थिक तरतूद करून ती तालुकास्तरावर वितरित करावी जेणेकरून ५०० शिक्षक आर्थिक विवंचनेतून मुक्त होतील, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख मधुकर वालतुरे, जिल्हाध्यक्ष काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, प्रशांत हिवर्डे, राजेश हिवाळे, विष्णू बोरुडे, रमेश जाधव, संजय भुमे, प्रवीण पांडे, संतोष थोरात, बळीराम भुमरे आदींनी केली आहे.
शिक्षकांच्या वेतनासाठी वाढीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी
By admin | Updated: June 3, 2014 01:09 IST