कन्नड : येथील राजमहल हॉटेलच्या खोली क्रमांक १०९ मध्ये २२ वर्षीय तरुणीने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी राम वाघुळे (रा. अंधानेर) याच्याविरोधात मंगळवारी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तथापि मुलीची हत्या झाली आहे, असे म्हणत मयत मुलीच्या मावशीने खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने मयत तरुणाचे नातेवाईक तसेच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे नातेवाईकांनी कन्नड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.
अखेर बुधवारी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, वंचितचे कार्यकर्ते व मयताचे नातेवाईक यांच्यात चर्चा झाली. या प्रकरणात सखोल चौकशीत जे काही निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी भामरे यांनी दिले. अखेर या प्रकरणावर पडदा टाकला गेला. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा सहसचिव अनिल सिरसाट, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. लता बमणे आदींची उपस्थिती होती.
----------------
फोटो - कारवाईचे आश्वासन देणारे लेखी पत्र देताना उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे.