औरंगाबाद : भाजपापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही दुष्काळाचा मुद्दा उचलून धरला आहे. मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळून निघत आहेत. त्यामुळे सरकारने मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांकडील संपूर्ण कर्ज आणि वीज बिल माफ करावे, अशी मागणी मनसेच्या वतीने आज पत्रकार परिषदेत करण्यात आली. शासनाने तातडीने हा निर्णय न घेतल्यास तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मनसेचे नेते सुभाष पाटील, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, डॉ. सुनील शिंदे, बाबासाहेब डांगे, शहराध्यक्ष सुमित खांबेकर, नगरसेवक राज वानखेडे आदींनी आज दुष्काळाच्या प्रश्नावर पक्षाची भूमिका मांडली. सुभाष पाटील म्हणाले की, मराठवाड्याला गोदावरी आणि कृष्णा या दोन्ही खोऱ्यांतील पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे दरवर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. शहराध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले की, सर्व तहसील कार्यालयांमध्ये पक्षाने निवेदने दिली आहेत. तरीही शासनाकडून ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता मनसेने या विषयावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांना निवेदन सादर केले. शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे सर्व कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांचे वीज बिल शंभर टक्के माफ करावे, वरच्या धरणातून जायकवाडीत तातडीने पाणी सोडावे, पावसाअभावी वाया गेलेल्या पेरणीच्या खर्चाची भरपाई देण्यात यावी इ. मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
By admin | Updated: August 22, 2014 00:18 IST