आशपाक पठाण लातूरजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनावर गेल्या काही महिन्यांपासून गोंधळ सुरू आहे़ अतिरिक्तची यादी तयार करण्यापासून ते समायोजनाच्या प्रक्रियेत संस्थाचालक व शिक्षणाधिकारी यांच्यात ठिणगी उडत गेली़ प्राथमिक व माध्यमिक विभागाचे जवळपास ३४८ शिक्षक अतिरिक्त ठरल्यावर यापैकी १०४ जणांचे समायोजन करण्यात आले होते़ मात्र, या शिक्षकांना ज्या शाळा देण्यात आल्या होत्या, त्या शाळेच्या व्यवस्थापनाने शिक्षण विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शिक्षकांना परत पाठविले आहे़लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात १५८ शिक्षक अतिरिक्त झाले असून यातील ३१ जणांचे समायोजन करण्यात आले होते़ त्यापैकी केवळ दोन शिक्षकांना रूजू करून घेण्यात आले आहे़ तर माध्यमिक विभागाचे १९० शिक्षक अतिरिक्त झाले असून यातील ७३ जणांचे समायोजन करण्यात आले होते़ यातील सहा शिक्षकांना रूजू करून इतर संस्थांनी मात्र शिक्षकांना जिल्हा परिषदेचा रस्ता दाखविला आहे़ सेवाज्येष्ठतेनुसार आॅनलाईन पध्दतीने रिक्त जागा असलेल्या शाळांवर विषयानुसार प्रक्रिया राबविण्यात आली होती़ ही प्रक्रिया हाणून पाडण्यासाठी संस्थाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीला आव्हान देत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात शिक्षणाधिकाऱ्यांची खरडपट्टी करण्याचा प्रयत्न केला़ विरोध झुगारून शासन आदेशानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली़ समायोजन केलेल्या शिक्षकांना नियुक्ती आदेश देऊन शाळांवर पाठविण्यात आले मात्र, शासन आदेशाला खो देत संस्थाचालकांनी बाहेरून आलेल्या शिक्षकांना समायोजन करून घेण्यास नकार दिला़ समायोजन करण्यात आलेल्या या शिक्षकांची अवस्था फुटबॉल प्रमाणे झाली आहे़ तिकडे संस्थाचालक रूजू करून घेईना अन् शिक्षणाधिकारी पत्र दिल्याचे सांगत बोलू देईना, अशा दुहेरी संकटात शिक्षक सापडले आहेत़ वारंवार संस्था आणि जिल्हा परिषदेच्या दारात खेटे मारून शिक्षकही थकले आहेत़ शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या तरी संस्थाचालक त्याला दाद द्यायला तयार नाहीत़ आजवर एकाही संस्थेने उत्तर दिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले़
शिक्षक समायोजनाला संस्थाचालकांचा खोडा
By admin | Updated: December 25, 2016 23:46 IST