वाळूज महानगर : सिडको अधिसूचित क्षेत्रातील खासगी गटनंबरमधील उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील अनधिकृत बांधकाम व साहित्य हटविण्याची मागणी सिडको वाळूज महानगर कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सिडको प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे.
येथील गट क्रमांक ४८, ४९ व ५२ या ठिकाणी विकास आराखड्यानुसार उद्यानासाठी भूखंड आरक्षित ठेवण्यात आले आहे. या आरक्षित भूखंडावर परिसरातील बिल्डराकडून बांधकाम साहित्य आणून टाकण्यात आले आहे. याशिवाय पत्र्याचे शेडही उभारण्यात आले आहे. उद्यानाच्या जागेवर अतिक्रमण करून ही जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात सोमवारी सिडको वाळूजमहानगर कृती समितीच्या शिष्टमंडळाने सिडकोचे वसाहत अधिकारी गजाजन साटोटे यांची भेट घेऊन या अतिक्रमणासंदर्भात चर्चा करून निवेदन सादर केले आहे. सिडकोच्या विकास आराखड्यानुसार या मोकळ्या भूखंडावर उद्यानाचे आरक्षण असून सिडको प्रशासनाने केवळ संरक्षक भिंत बांधण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र, संबंधितांकडून या जागेवर पत्र्याचे शेड उभारून बांधकामाचे साहित्य टाकले जात असल्याची ओरडही शिष्टमंडळाने करून संबंधितांविरुध्द कारवाई करण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात कृती समितीचे अध्यक्ष तथा तीसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, नरेंद्र यादव, प्रवीण पाटील, बाळासाहेब गाढे, संतोष गाढे आदींची समावेश होता.
फोटो ओळ- उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील अनधिकृत बांधकाम व साहित्य हटवावे, यासाठी सिडको वाळूज महानगर कृती समितीच्या वतीने सिडकोचे वसाहत अधिकारी गजाजन साटोटे यांना निवेदन देताना कृती समितीचे पदाधिकारी.