लातूर : विषमतेवर आधारलेली कुटुंब व्यवस्थाच नाकारली पाहिजे. जातीअंत व नवसमाज निर्मितीसाठी पुरोगामी चळवळीला अधिक बळकट केले पाहिजे. यासाठी प्रत्येक जातीतील महिलांशी संवाद ठेवला पाहिजे. पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेला नाकारून समानतेवर आधारलेली कुटुंब व्यवस्था निर्माण केली पाहिजे. त्याशिवाय स्त्रीला सन्मान मिळणार नाही, असे प्रतिपादन डॉ. प्रतिमा परदेशी यांनी केले.अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या ३८ व्या अधिवेशन समारोपप्रसंगी रविवारी त्या बोलत होत्या. विचारमंचावर प्रा. नूतन माळवी, सतीश जामोदकर, प्राचार्य शिवाजी माडे, हिराचंद बोरकुटे यांची उपस्थिती होती. डॉ. परदेशी म्हणाल्या, महिलांच्या बाबतीत सावित्रीच्या लेकी, जिजाऊंच्या लेकी, अहिल्याबार्इंच्या लेकी असा भेदाभेद करून विभाजन करू नका. सर्व लेकी समान आहेत. जातीच्या उतरंडीवरच फुली मारून चालणार नाही, तर स्त्री दास्यत्वावरही फुली मारली पाहिजे. विषम आणि शोषणावरील समाजाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सत्यशोधकीने पुढे आले पाहिजे. फुलेंची कुटुंब व्यवस्था ही लोकशाहीवर आधारित आहे. तर ब्राह्मणी कुटुंब व्यवस्था विषमतेवर आधारित आहे. या व्यवस्थेत स्त्री गुलाम आहे. मानवतेच्या दृष्टीने तिचे हक्क नाकारले जातात. तिला चौकटीत डांबून ठेवले जाते. या कुटुंब व्यवस्थेवर पुरुषांचे वर्चस्व आहे. आम्हाला फुलेंची लोकशाहीवर आधारलेली कुटुंब व्यवस्था महत्त्वाची आहे, असेही त्या म्हणाल्या. (अधिक वृत्त हॅलो / २ वर)
विषमतेवर आधारलेली कुटुंब व्यवस्था नाकारायला हवी
By admin | Updated: January 8, 2017 23:31 IST