वाळूज महानगर : परिसरात लॉकडाऊन व संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जात असल्याने व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. उद्योगनगरीत कोरोना रुग्णांची संख्या घटत चालल्याने आरोग्य विभागासह सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे वाळूज एमआयडीसी परिसरातील बंद पडलेले तीन कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. या कोविड सेंटरमध्ये बेड शिल्लक नसल्यामुळे कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. खाजगी रुग्णालयातील बेडही कमी पडू लागल्याने प्रशासनही चक्रावून गेले होते. आठवडाभरापूर्वी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांना बळजबरीने डिस्चार्ज दिला जात होता.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन सुरू केला. याची वाळूज महानगर परिसरात पोलिसांकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
...............................................
३ हजार रुग्ण कोरोनामुक्त
बजाजनगर व परिसरात १ फेब्रुवारीपासून आतापर्यंत ३,३१९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पैकी ३ हजार रुग्ण उपचारानंतर घरी सुखरूप परतले असून आजघडीला ३०० च्या आसपास रुग्णावर उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम बामणे यांनी सांगितले. १ ते ७ एप्रिल या पहिल्या आठवड्यात ४७९ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. ८ ते १४ एप्रिलदरम्यान ४१८, १५ ते २१ एप्रिल दरम्यान ३६९ व २२ ते २८ एप्रिलदरम्यान ३२७ अशा प्रकारे कोरोनाच्या रुग्णांत घट झाली आहे. या परिसरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्के असून, मृत्यूदर १.१ टक्का असल्याचे डॉ. बामणे यांनी सांगितले.
----------------------------