औरंगाबाद : अंतिम मुदत संपली तरी स्मार्ट सिटीच्या प्रकल्प अहवालाचा पेच कायम आहे. ग्रीन फिल्ड प्रकारात नक्षत्रवाडीची निवड करायची की, चिकलठाणा भागाची हे अजूनही निश्चित झालेले नाही. म्हणून मनपाने राज्य सरकारकडे पाच दिवसांची वाढीव मुदत मागून घेतली आहे. आता जागेविषयीचा निर्णय दोन दिवसांत घेण्याचे सोमवारी मनपात झालेल्या संयुक्त बैठकीत ठरले. महापौर त्र्यंबक तुपे यांनी सोमवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीला उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेता राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेता जहांगीर खान, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त आयुब खान, रवींद्र निकम, मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस.बी. नाईकवाडे, आरोग्य अधिकारी डॉ. संध्या टाकळकर, नगररचना विभागाचे ए.बी. देशमुख आदी उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातीलाच स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाचा विषय उपस्थित झाला. राज्य सरकारकडे प्रकल्प अहवाल सादर करण्याची मुदत सोमवारी संपली; परंतु तरीही मनपाचा प्रस्ताव सादर झाला नाही. याविषयी महापौरांनी कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांच्याकडे विचारणा केली. त्यावर सिकंदर अली यांनी स्मार्ट सिटी चिकलठाणा भागातच व्हावी यासाठी खुद्द विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हेही प्रयत्नशील आहेत. बागडे यांनी सोमवारी सायंकाळी मनपातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याविषयी सूचना दिल्या. डीएमआयसीला लागून असल्यामुळे या भागातच स्मार्ट सिटी विकसित करणे योग्य राहील, असे बागडे यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. पालिकेतील पदाधिकाऱ्यांचा ओढा चिकलठाणा भागाकडे असला तरी पालिका प्रशासन मात्र नक्षत्रवाडीच्या बाजूने आहे. नक्षत्रवाडी परिसरात एकूण ५५० एकर मोकळी जागा उपलब्ध आहे. हा परिसर डीएमआयसी, वाळूज औद्योगिक वसाहतीला लागून आहे. तसेच ५५० एकरपैकी २७० एकर जागा ही शासनाच्या मालकीची आहे. ग्रीन फिल्ड प्रकारात किमान २५० एकर जमीन असणे आवश्यक आहे. तेवढी जमीन या ठिकाणी सहज मिळेल, असे प्रशासनाचे मत आहे.
‘स्मार्ट’ जागेचा निर्णय दोन दिवसांत
By admin | Updated: December 1, 2015 00:30 IST