गंगापूर : श्री. दत्त जन्मसोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय दत्तमंदिर देवस्थान देवगड यांच्या वतीने घेण्यात आला आहे. अशी माहिती गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी दिली.
याबाबत श्री क्षेत्र देवगड संस्थानने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दरवर्षी भगवान दत्तात्रयांचा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग भितीच्या सावटाखाली वावरत असताना सावधगिरीचा उपाय म्हणून शासन व प्रशासनाने सर्वच सार्वजनिक तथा धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनास बंदी केलेली आहे. त्यामुळे यंदा दत्त जयंती सोहळा अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी (दि.२९) दुपारी चार वाजेपासून महाद्वार बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिरात साध्या पद्धतीने पूजा होईल. याचा सोहळा सोशल मीडियावर लाईव्ह दाखविण्यात येईल. यात्रा बंदच ठेवण्यात आल्याने कोणीही व्यावसायिकांनी आपली दुकाने आणू नये, असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले.