परभणी : शहरातील भीमनगर भागात झालेल्या मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना २५ जून रोजी घडली. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहितीनुसार,भीमनगर येथील प्रकाश दामोधर मोरे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, प्रकाश मोरे याच्या बहिणीने रवी अच्युत काळे याच्यासोबत प्रेमविवाह केला आहे. याच कारणावरुन आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून घरासमोर दंगा केला. प्रकाश मोरे यांचा भाच्चा पंकज यास मारहाण करण्यास सुरूवात केली. ही मारहाण सुरू असताना प्रकाशची आई अनुसया भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांना काठीने डोक्यात मारहाण झाली. यात अनुसाया दामोधर मोरे (वय ६५) जबर जखमी झाल्या. हा सर्व प्रकार २४ जून रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला. जखमी अनुसया यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना २५ जून रोजी सकाळी १०.५५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रकाश मोरे यांच्या फिर्यादीवरुन अमित अच्युत काळे, रवी अच्युत काळे, विष्णू काळे, संतोष विष्णू काळे, ऋषी अच्युत काळे, आनंद कांबळे व अन्य दोघांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी घटनास्थळास भेट दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक एन. एन. बेंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अशोक नवले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.दरम्यान, बालाजी कच्छवे, नवनाथ मुंडे, गोविंद एकीलवाले, सदाशिव काळे, शेख मुस्ताक यांनी तत्काळ तपास करीत अमित काळे, संतोष काळे, ऋषी काळे, रवी काळे, विष्णू काळे या पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)
मारहाणीत महिलेचा मृत्यू
By admin | Updated: June 26, 2014 00:39 IST