गंगापूर : तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव वेगाने होत असून, दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. यामध्ये ग्रामीण भागात रुग्ण वाढीचे प्रमाण अधिक आहे. संचारबंदीचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने व तोकड्या उपाययोजनामुळे तालुक्यात एकूण बाधितांचा आकडा सहा हजार एकशे पाचपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये आतापर्यंत ९१ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. मृत्यूचे प्रमाण हे तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत म्हणजे रांजणगाव, वाळूज, जोगेश्वरी परिसरात आहे.
एप्रिलच्या सुरुवातीला तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचा शिरकाव झाला होता. मागील आठवड्यात रुग्णवाढीचा वेग मंदावला असला तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहिल्या लाटेत एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्यांत ६४ जणांचा, तर दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी २०२१ ते एप्रिल २०२१ या तीन महिन्यांत २७ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. धक्कादायक म्हणजे पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मृत्यूची सरासरी प्रतिमहा तीनने वाढलेली असून, तालुक्यात आतापर्यंत सरासरी २.३ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये औद्योगिक परिसरातील रांजणगाव, वाळूज व जोगेश्वरी या गावांतील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्याखालोखाल गंगापूर व लासूरचाचा समावेश आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या गंगापूर, लासूर, रांजणगाव, वाळूज व भेंडाळापैकी गंगापुरात रुग्णवाढीचा वेग काही प्रमाणात कमी झाला असला तरी नागरिकांद्वारे नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. वाळूज- रांजणगावात औद्योगिक वसाहतीत कारखाने सुरू असल्याने येथेही नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या पाच गावांपैकी केवळ भेंडाळ्यात प्रशासनाने कन्टेंंमेंट झोन जाहीर केल्याने या गावात दोन दिवसांत एकही रुग्ण आढळला नाही.
चौकट -
प्रशासकीय यंत्रणा अपयशी
सकाळी ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा असली तरी, या काळात इतर आस्थापनेही खुलेआम सुरू राहतात. दुपारनंतरही अनेक दुकाने अर्ध शटरवर सुरू राहत आहेत. याशिवाय बाधित रुग्णांच्या संपर्कातील दहा व्यक्तींचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तसे होताना दिसत नसल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. अपुरी कर्मचारी संख्या व उपाययोजनांच्या थातूरमातूर अंमलबजावणीमुळे रुग्णवाढीला ‘ब्रेक’ लावण्यात प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसून येते.