हिंगोली : शहरापासून जवळ असलेल्या लिंबाळा शिवारात भरधाव कारची दुचाकीस धडक बसून गंभीर जखमी झालेले वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक तुळशीराम सरोदे (वय ५०) यांचा उपचारादरम्यान २४ सप्टेंबर रोजी नांदेड येथे मृत्यू झाला. २३ सप्टेंबर रोजी दुपारी सपोउपनि अशोक सरोदे हे शासकीय कामासाठी दुचाकी क्रमांक एम. एच. ३८- जी. ७२ वरून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे निघाले होते. यावेळी सोबत त्यांचा मुलगा होता. हिंगोली- औंढा रस्त्यावरील देवाळा पाटीजवळ समोरून आलेल्या कार क्रमांक एम. एच. ३८- ५२५५ च्या चालकाने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात अशोक सरोदे व त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याने हिंगोली येथे जिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना २४ सप्टेंबर रोजी सकाळी अशोक सरोदे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी श्रीकांत अशोक सरोदे यांच्या फिर्यादीवरून कारचालक आरोपी विलास किशन पाखरे (४५, रा. पिंपळखुटा) याच्याविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि दिलीप ठोंबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि एन.आर. राठोड, पोना शेख शकील करीत आहेत. (प्रतिनिधी)
पोलिसाचा मृत्यू; एकावर गुन्हा
By admin | Updated: September 27, 2014 00:54 IST