उस्मानाबाद : भरधाव वेगातील एका दुचाकीने समोरून एका दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका सहा वर्षीय मुलासह त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला़ तर एक महिला, मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ ही घटना शनिवारी दुपारी उस्मानाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खेड पाटीजवळ घडली़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील सापनाई येथील युवराज राऊत हे उस्मानाबादेत कामाला होते़ रविवारी सुटी असल्याने शनिवारी दुपारी ते पत्नी किर्ती, मुलगा शुभम व वेदांत यांच्यासोबत दुचाकीवरून (क्ऱएम़एच़१२- ई़५७७४) उस्मानाबादहून गावाकडे जात होते़ त्यांची दुचाकी खेडपाटीजवळ आली असता समोरून आलेल्या दुचाकीने (क्ऱएम़एच़१३- वाय़९८१२) समोरून जोराची धडक दिली़ या अपघातात दुचाकीवरील युवराज राऊत यांच्यासह त्यांचा सहा वर्षाचा मुलगा वेदांत याचा जागीच मृत्यू झाला़ तर मयताची पत्नी किर्ती राऊत व मुलगा शुभम हे जखमी झाले़ घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांसह नागरिकांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले़ तर धडक देणाऱ्या दुचाकीवरील दोघांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ (प्रतिनिधी)
दुचाकी अपघातात बाप-लेकाचा मृत्यू
By admin | Updated: July 31, 2016 01:11 IST