नळदुर्ग : काम ऐकले नाही म्हणून गुप्तांगावर जबर मारहाण केल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे घडली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी या प्रकरणातील आरोपीस अटक करावी, अशी मागणी करीत गुरूवारी अणदूर बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते. दरम्यान, या घटनेमुळे गुरुवारचा आठवडी बाजारही भरू शकला नाही.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील वत्सलानगर भागात राहणारा सोमनाथ सहदेव करपे (वय २५) या युवकास त्याच्याच वस्तीतील मोहन पांडुरंग दणाणे याने दुकानातून सामान आणण्याचे काम सांगितले होते. परंतु, सोमनाथ याने ते काम ऐकले नाही म्हणून मोहन दणाणे याने त्यास गुप्तांगावर मारहाण केली. या घटनेनंतर सोमनाथ करपे यास तातडीने अणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. यत्नाळकर यांनी त्यास पुढील उपचारासाठी सोलापूरला नेण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला.त्यामुळे त्यास सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी रात्री उशिरा सिद्राम श्रीमंत कबाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहन पांडुरंग दणाणे याच्याविरुध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी सोमनाथ याचे शवविच्छेदन करून प्रेत अणदूर गावात आणण्यात येणार होते. परंतु, सोमनाथच्या खुन्याला अटक करावी अशी मागणी करीत गुरूवारी सकाळपासूनच ग्रामस्थांनी अणदूर बंद ठेवले. गावात गल्लोगल्ली या घटनेचा निषेध नोंदविणारे फलक लावण्यात आले होते. यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याची माहिती मिळताच तहसीलदार काशीनाथ पाटील, नायब तहसीलदार माणिक चव्हाण, मंडळ अधिकारी गांदले तातडीने अणदुरात दाखल झाले. दुपारी अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली घाडगे याही तेथे आल्या. नळदुर्ग पोलिसांनी बंदोबस्तही चोख ठेवला होता. अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी प्रेत ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. मयत सोमनाथ करपे यांच्या पश्चात वृध्द आई व एक बहीण असा परिवार आहे. दरम्यान, खून प्रकरणातील आरोपीला गुरूवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सोलापुरातून अटक करण्यात आली. (वार्ताहर)गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सोमनाथ करपे यांचे शव सोलापूर शासकीय रुग्णालयातून अणदूर येथे आणण्यात आले. परंतु, आरोपीला अटक करेपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला. तसेच अंत्यसंस्कार न करता शव ग्रामपंचायतीसमोर नेऊन ठेवण्याची भूमिका घेतली. अखेर सपोनि फुलचंद मेंगडे यांनी आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना केल्याची माहिती देवून लवकरच त्यास अटक करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अॅड. दीपक आलुरे, साहेबराव घुगे, मलंग शेख आदींनीही मध्यस्थितीसाठी पुढाकर घेतला. यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
मारहाणीत युवकाचा मृत्यू
By admin | Updated: August 21, 2015 00:41 IST