जालना : धुळे येथे एका डॉक्टरला रूग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जालना शाखेच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शहरातील विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, धुळे येथे रूग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. रोहन यांना मारहाण केली. ते त्यात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू आहेत. अशा आरोपींना कडक शासन करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. खाजगी तसेच शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगली सुरक्षितता देण्याची मागणीही यावेळी डॉक्टरांनी केली. निवेदनावर आयएमएचे अध्यक्षा डॉ. सुश्मिता गादिया, सचिव डॉ. राहुल तोतला यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शहरातील शेकडो डॉक्टरांनी मोर्चात सहभागी होत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. महसूल कर्मचाऱ्यांचे धरणे औरंगाबाद येथील जिल्हाधिकरी कार्यालयातील अव्वल कारकून गजानन चौधरी यांचा अतिताणामुळे हृदयविकाराने मृत्यू झाला होता. चौधरी यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या जालना जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. १७ मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर व्ही.डी.म्हस्के, पी.बी. मते, एस.एम.जोशी, शरद नरवडे, एन. डी. चौधरी, रवि कांबळे, एम. एम. महाजन, विनोद भालेराव, संदीप गाढवे, एम. बी. उन्हाळे, एस. जी. खांडेभराड, संजय सुरडकर, प्रशांत कल्याणकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांची नावे आहेत. (प्रतिनिधी)
दिवस आंदोलनांचा...!
By admin | Updated: March 18, 2017 00:12 IST