औरंगाबाद : शहरात साथरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. वातावरणातील उकाड्यामुळे कूलर अजूनही सुरू आहेत. तसेच घरालगतची डबकी व साठवलेल्या स्वच्छ पाण्यातील डासांची पैदास वाढल्यामुळे तापाचे रुग्ण दवाखान्यांत दिसून येत आहेत. फॉगिंग व औषधी फवारणी वॉर्डांमध्ये होत नसल्याचा आरोप नागरिकांनी सुरू केल्यामुळे साथरोगांचे नियंत्रण कागदावरच असल्याचे दिसते आहे. मनपा आरोग्य विभागाने अॅबेट वाटप मोठ्या प्रमाणात केले आहे. मात्र, फॉगिंग कोणत्याही वॉर्डात केलेले नाही. जेथे मागणी तेथे फॉगिंग, असे काम सुरू असल्यामुळे पालिकेने औषधी फवारणी आणि धूरफवारणीसाठी कोणतेही वेळापत्रक तयार केलेले नाही. कामगार कॉलनी, विठ्ठलनगरच्या नगरसेविका सविता घडामोडे व त्यांच्या मुलाला काल डेंग्यूसदृश ताप आल्याने धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डेंग्यूने आजवर ९ बळी घेतले आहेत. मनपा दप्तरी चार महिन्यांत १२० डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली असली तरी तापेचे हजारो रुग्ण आहेत. साथरोग वाढण्यासाठी मनपाचा घनकचरा व्यवस्थापन, नालेसफाई करणारा विभाग, दूषित पाणीपुरवठा करणारी यंत्रणा जबाबदार आहे.
मनपाच्या कागदी घोड्यावर डेंग्यूचा डास स्वार
By admin | Updated: August 22, 2014 00:20 IST