बीड: बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची नितांत गरज असून यासाठी जिल्हास्तरावर विशेष दक्षता पथकांची नेमणुक करुन अशा व्यावसायिकांविरुद्ध धाडसत्र मोहीम राबविण्यात यावी अशी सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या. बोगस वैद्यकीय व्यावसायीकांवर आळा घालण्यासाठी व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गठीत जिल्हास्तरीय पुनर्विलोकन बैठक जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा आढावा घेऊन त्यांच्याविरुद्ध संबंधित न्यायालयात खटले दाखल करण्याची रितसर कारवाई पोलीस विभागामार्फत होणे आवश्यक आहे. यासाठी समितीचे सदस्य जिल्हा शल्य चिकित्सक यांनाही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविणे आवश्यक आहे. समितीच्या स्थापनेपासून जून-२०१४ पर्यंत जिल्ह्यातील एकूण २७ पोलिस ठाण्यार्तंगत ४६ बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या पैकी दोन प्रकरणात संबंधित आरोपींना शिक्षा झाली आहे तर ६ आरोपी न्यायालयातून सुटले आहे तर ३८ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. या बैठकीत न्यायप्रविष्ट प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रकरणातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या सध्यच्या व्यवसायाची माहिती घेण्याची गरजे आहे. जर या प्रकरणातील आरोपी पुन्हा बोगस व्यवसाय करीत असेल तर त्यांच्या विरुद्ध आरोग्य विभाग पोलीस विभागाने कडक कारवाई करण्याची गरज आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी तात्काळ तपासणी करुन पुढील कारवाई करावी अशी सूचना जिल्हाधिकारी राम यांनी केली. यावेळी समितीचे सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोवर्धन डोईफोडे, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. राम देशपांडे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त रुपेश व्हटकर, एसआरटी अंबाजोगाईचे डॉ. हरि भुमे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष आर.टी. गर्जे, इमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. पाखरे, डॉ. जयंत लऊळकर, सिराज शेख आयुब, पोलीस अधीक्षक (गृह) दिनकर शिंदे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
बोगस डॉक्टरांविरुद्ध दक्षता पथकामार्फत धाडी
By admin | Updated: July 18, 2014 01:45 IST